गेल्या वर्षी देशभरातील 26 हजार वेबसाइट ‘हॅक’

नवी दिल्ली – गेल्या वर्षभरात देशभरातील 26 हजार संकेतस्थळे हॅक झाली. 2019 साली हॅक झालेल्या संकेतस्थळांच्या तुलनेत ही संख्या दिड हजाराने अधिक आहे, अशी माहिती आज संसदेत देण्यात आली.

2018 साली 17,560, 2019 साली 24, 768 आणि 2020 साली 26,121 संकेतस्थळे हॅक झाली, असे “इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’च्या डाटामध्ये म्हटले असल्याचे दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.

भारतातील सायबर यंत्रणांवर अधुनमधून सायबर हल्ले करण्याचे प्रयत्न केले जात असतात. जगातील वेगवेगळ्या भागातल्या संगणकीय यंत्रणा भेदण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांकडून केला जात असतो. ओळख दडवण्यासाठी फसव्या यंत्रणा आणि छुप्या सर्व्हरचाही वापर केला जात असतो.

अल्जेरिया, ब्राझील, चीन, फ्रान्स, इंडोनेशिया, नेदरलॅंड्‌स, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, सर्बिया, दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड, ट्युनिशिया, तुर्की, अमेरिका, व्हिएतनाम इत्यादी देशांमधून असे सायबर हल्ले होत असतात, असे तज्ञांनी केलेल्या तपासणीत आढळले आहे. असे सायबर हल्ले रोखण्यासाठी “सीईआरटी’कडून संबंधित देशांमधील यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे, असेही धोत्रे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.