- सहायक आयुक्त संगीता डावखर यांची माहिती
पुणे – मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ठेवत, त्याची माहिती सामाजिक न्याय विभागास देण्यास महाविद्यालयांनी टाळाटाळ केली. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याप्रकरणी जिल्ह्यातील 260 महाविद्यालयांना सामाजिक न्याय विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली. याचा खुलासा पाच दिवसांत देण्याचे आदेश सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी दिले.
आर्थिकदृष्या दुर्बल मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक शुल्क अथवा परीक्षा शुल्क अभावी आर्थिक अडचण होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी सामाजिक न्याय विभागाकडून महाविद्यालयांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु, ती देतांना विद्यार्थ्यांकडून जी माहिती घेवून सामाजिक न्याय विभागाला वेळेत देणे अपेक्षित असते.
याबाबतीत अनेक महाविद्यालय टाळाटाळ करतात. असाच प्रकार पुणे शहर व जिल्ह्यात घडला असून जिल्ह्यातील जवळपास 260 महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली न काढता प्रलंबित ठेवणारे महाविद्यालये अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.