मेक इन इंडिया’ : प्रथमच पुणे मेट्रोसाठी ऍल्युमिनियम डब्यांचा वापर
पुणे – मेट्रोच्या “पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट’ आणि “वनाझ ते रामवाडी’ या दोन मेट्रो मार्गांसाठी आवश्यक असलेल्या 102 डब्यांची निविदा “टिटागर्ह फिरेमा’ कंपनीला देण्यात अली आहे. ही कंपनी पहिल्या 8 ट्रेन इटलीमध्ये बनवणार असून, उर्वरित 26 ट्रेनचा संच कोलकाता आणि त्यानंतर नागपूर येथील महामेट्रोच्या कारखान्यात बनवण्यात येणार आहे. देशात प्रथमच “मेक इन इंडिया’ अंतर्गत नागपूरमध्ये ऍल्युमिनियम डब्यांची निर्मिती होणार असून, त्याचा वापर पुणे मेट्रो प्रकल्पात होणार आहे.
ट्रेन संच निर्मितीच्या संदर्भातील किक-ऑफ मिटींग गुरुवारी झाली. याला “महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, डायरेक्टर ऑफ रोलिंग स्टॉक ऍन्ड सिग्नलिंग सुनील माथूर, संचालक (प्रकल्प) अतुल गाडगीळ, संचालक (नियोजन) रामनाथ सुब्रमण्यम आणि “टिटागर्ह’चे व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी आणि फायरमा इटलीचे सीईओ लुइगी कोररडी, हेड ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट फॅब्रिझि ओझमगनी, हेड ऑफ ऑपेरेशन फ्रान्सिस्को फलांग, प्रकल्प इंजिनीअर दारिओसेपे उपस्थित होते.
पुणे मेट्रोसाठी 3 डब्यांची पहिली ट्रेन पुढील दीड वर्षांत तयार होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने “ट्रेनसेट’साठी उर्वरित डब्यांचा पुरवठा केला जाणार आहे. “पुणे मेट्रो’च्या दोन्ही मार्गिकांसाठी 34 ट्रेनसेट, म्हणजेच 102 डब्यांची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेवरील प्रवासीसंख्या पाहता, त्यासाठी 25 ट्रेनसेट (75 डबे) अपेक्षित धरण्यात आले आहेत. तर, वनाझ ते रामवाडी मार्गिकेसाठी 9 ट्रेनसेटचा (27 डबे) वापरण्याची शक्यता आहे.
महामेट्रो जगातील सर्वोत्तम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी बांधील असून, त्याचाच एक भाग म्हणून उच्च दर्जाचे ट्रेन संच पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येत आहेत.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो