नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण 2 कोटी 23 लाख रूपयांची संपत्ती आहे. वर्षभरात ती संपत्ती 26 लाख रूपयांनी वाढली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर मोदींकडे 31 मार्च 2022 पर्यंत असणाऱ्या संपत्तीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
मोदींच्या संपत्तीमध्ये प्रामुख्याने बॅंक ठेवींचा समावेश आहे. जमीन दान केल्याने त्यांच्याकडे सध्या कुठलीही स्थावर मालमत्ता नाही. मोदींनी बॉंड, शेअर किंवा मुच्युअल फंडात कुठलीही गुंतवणूक केलेली नाही. त्यांच्या मालकीचे एकही वाहन नाही. त्यांच्याकडे 1.73 लाख रूपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.
मोदींकडे वर्षभरापूर्वी जमिनीच्या स्वरूपात 1.1 कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता होती. ती जमीन गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी ती जमीन इतर तिघांसमवेत ऑक्टोबर 2002 मध्ये खरेदी केली. त्या जमिनीत चौघांची मिळून समान 25 टक्के हिस्सेदारी होती.
मात्र, मोदींनी त्यांच्या वाट्याची जमीन दान केली. मोदींकडे 31 मार्च 2022 पर्यंत 35 हजार 250 रूपयांची रोख रक्कम होती. मोदींची पोस्ट ऑफिसमध्ये 9 लाख रूपयांची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटस् आहेत. त्यांच्या नावे 1 लाख 89 हजार 305 रूपयांच्या विमा पॉलिसी आहेत.