राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी 26 इच्छुकांची हजेरी

नगर – लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून, 9 जागांसाठी 26 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, बाबासाहेब गांगर्डे यांनी मुलाखती दिल्या आहेत, तर श्रीगोंदा मतदारसंघातून आ. राहुल जगताप आणि घनश्‍याम शेलार, राहुरी मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे, कोपरगावमधून अशुतोष काळे यांनी मुलाखती दिल्या. पारनेर मतदारसंघातून नीलेश लंके, प्रशांत गायकवाड, सुजित झावरे, माधवराव लामखडे यांनी, तर शेवगाव-पाथर्डीतून चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे यांनी मुलाखती दिल्या.
नगर शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.

संग्राम जगताप हे पक्षाच्या मुलाखतीस अनुपस्थित होते. परंतु त्यांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून आ. अरुण जगताप, माजी आ. दादाभाऊ कळमकर या मुलाखतीस हजर होते. आ. संग्राम जगताप हे मागील तीन दिवसांपासून मुंबईत असल्याने ते मुलाखतीस हजर राहू शकलेले नाहीत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर कायम असल्याचे आ. अरुण जगताप आणि दादाभाऊ कळमकर यांनी सांगितले.

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी भवन येथे उपस्थित राहून पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. मध्यंतरी आ. जगताप हेही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. परंतु त्यांनी राष्ट्रवादीकडे पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. तथापि, श्रीगोंद्याचे राजकारण दिवसागणिक बदलत आहे.

माजी मंत्री बबनराव पाचपुते हे भाजपात फारच सुखी आहेत, अशी स्थिती नाही. त्यामुळे तेही ऐनवेळी परतीचा मार्ग स्वीकारून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास पाचपुते हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. परंतु आ. राहुल जगताप यांची त्यावेळी मोठी कोंडी होण्याची शक्‍यता आहे. आ. जगताप यांनी पक्षाकडे मुलाखत दिली असली, तरी नजिकच्या काळात श्रीगोंद्याच्या राजकारणात कोणते बदल होतात यावरच या मुलाखतीला अर्थ असणार आहे. त्यामुळे आ. जगताप यांच्यासमोर साशंकतेचे वातावरण कायम राहणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.