पेशावर – पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनवा प्रांतात नुतनीकरण केल्या जात असलेले एक हिंदू मंदिर कट्टरवादी गटाच्या जमावाने पाडल्याप्रकरणी पोलिसांनी जमैत उलेमा ए इस्लाम या कट्टरवादी इस्लामी पक्षशी संबंधित 26 जणांना अटक केली आहे. ही घटना खैबर पख्तुनवा प्रांतात करक जिल्ह्यातल्या टेरी गावात घडली होती.
जमैत उलेमा ए इस्लाम (फझलूर रेहमान गट) कडून मंदिराच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरणाला विरोध केला जात होता. या जमावाने मंदिर पाडल्यावर मानवी हक्क विषयक कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. खैबर पख्तुनवा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान यांनीही ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून दोषींना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले.
या मंदिराच्या आवारात हिंदू संताची समाधी असून दर गुरुवारी या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हिंदू भाविक येथे येत असतात, असे हिंदू नेते पेश्वार हरून सारब दियाल यांनी सांगितले.