वारजे -चांदणी चौकातील संपूर्ण काम महाराष्ट्र दिनी अर्थात दि. 1 मे रोजी पूर्ण करण्याचा “सरकारी मुहूर्त’ ठरला होता. परंतु, तोपर्यंत केवळ 80 टक्केच काम पूर्ण झाले होते. गेल्या 20 दिवसांत कामाचा वेग पाहता आता दि. 25 जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चांदणी चौक येथे सुमारे 397 कोटी रुपये खर्चून 17 कि.मी. लांबीचे रस्ते तयार केले आहेत. रॅम्प, सेवा रस्ता, अंडरपास अशा रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. चांदणी चौकातील एकूण कामांपैकी 90 टक्के काम आता पूर्ण झाले आहे. आता, केवळ मुख्य पुलाचे शिल्लक आहे. बावधन-एनडीएला जोडणारा हा पूल 150 मीटर लांबीचा व 32 मीटर रुंदीचा असेल यापूर्वीचा हाच पूल 50 मीटर लांब तर 20 मीटर रुंदीचा होता. जुन्या पुलाचा पिलर रस्त्याच्या मध्यभागीच येत होता यातून वाहतुकीला अडथळा ठरत होता. नव्या पुलासाठी बांधलेले पिलर हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्याने वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, हे सर्व काम एक ते दीड महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
चांदणी चौक रस्ते प्रकल्पातील सुमारे 90 टक्के काम आता पूर्ण झालेले आहे. दि. 25 मे पासून गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येईल तर 25 जुलैपर्यंत चांदणी चौकातील सर्व मुख्य कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
– संजय कदम,प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे
हे काम पूर्ण झाले…
कोथरूडहून मुळशीकडे जाणारा अंडरपास रस्ता.
बावधन-पाषाण मार्गे वारजे, कात्रज जाणारा रॅम्प क्र.6 सुरू
मुळशी मार्गे मुंबईला जाणारा रॅम्प क्र. 2 सुरू
मुळशीहून कोथरूडकडे जाणारा रॅम्प क्र. 1 सुरू
कोथरूडहून बावधनला जाणारा रॅम्प क्र.7 चे 80 टक्के काम पूर्ण
वेद विहारहून एनडीएकडे जाणारा रस्ता पूर्ण
कोथरूडहून मुंबईकडे जाणारा सेवा रस्ता सुरू
हे काम अद्याप सुरू…
एनडीए चौक ते बावधनला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरूच
मुख्य पुलासाठी एकूण 22 खांब उभारले जात आहेत
22 पैकी बावधनच्या बाजूचे 10 खांब उभारले
एनडीएच्या बाजूचे 12 खांब उभारण्याचे काम सुरू
रॅम्प क्र. 3 व रॅम्प 7 चे 20 टक्के काम अपूर्ण