पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने शाळेच्या पाठीमागे कचरा जाळणाऱ्या इंद्रायणीनगर, भोसरी येथील इंटेलिजेंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे हे शहरात पाहणी करत होते. क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पाहणी करत असताना प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर येथील इंटेलिजेंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलच्या मागील बाजूस कचऱ्याचा ढीग जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता स्कूलच्या कर्मचाऱ्यांमार्फतच कचरा जाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या स्कूलविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार 25 हजारांचा दंड आकारण्यात आला. सहाय्यक आरोग्य अधिकारी कांबळे यांनी दंड ठोठावला.