नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई करताना आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला. त्या कारवाईत तब्बल 2 हजार 500 कोटी रुपयांचा हेरॉईन या अंमलीपदार्थाचा विक्रमी 354 किलो साठा जप्त करण्यात आला. त्याशिवाय, अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचे सदस्य असणाऱ्या अफगाण नागरिकासह चौघांना अटक करण्यात आली.
दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि हरियाणात अंमलीपदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याचा सुगावा दिल्ली पोलिसांना लागला. त्यावरून दिल्लीत राहणारा पण मूळचा जम्मू-काश्मीरचा रहिवासी असणारा रिझवान काश्मिरी पोलिसांच्या रडारवर आला. तो एका ठिकाणी हेरॉईन देण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला काही दिवसांपूर्वी पकडले. त्याने चौकशीवेळी साथीदारांची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत विविध भागांतून आणखी तिघांना अटक केली. त्यामध्ये अफगाण नागरिक हजरत अली आणि पंजाबचे रहिवासी असणाऱ्या गुरप्रीत सिंग, गुरज्योत सिंग यांचा समावेश आहे.
त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवरून हेरॉईन साठा जप्त करण्यात आला. त्याशिवाय, हेरॉईन बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायनेही हस्तगत करण्यात आली.
अफगाणिस्तानातून इराणमार्गे मुंबईत हेरॉईन बनवण्यासाठीचा कच्चा माल पाठवला जात होता. तो माल पुढील प्रक्रियेसाठी मध्य प्रदेशात पाठवला जायचा. त्यापासून हेरॉईन बनवल्यानंतर त्याची तस्करी भारतातील विविध भागांत केली जायची.
संबंधित रॅकेट परदेशांतही पसरल्याची माहिती समोर आली आहे. त्या रॅकेटचे दहशतवादी संघटनांशी लागेबांधे आहेत का, या दिशेने आता दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.