पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील कामांसाठी नियुक्त ठेकेदारांला सुमारे अडीच हजार कोटींची बिले अदा करण्यात आली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये 2 हजार 364 कोटी रुपयांची बिले ठेकेदारांना देण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 1052 कोटी रुपये स्थापत्यच्या ठेकेदारांना देण्यात आले आहे.
महापालिकेतील विविध विभागांच्या कामासाठी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार खर्च केला जातो. खर्चामध्ये भांडवली व महसुली खर्चाचा समावेश असतो. 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये भांडवली कामासाठी 2 हजार 364 कोटी 28 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्या संबंधित ठेकेदारांना 31 मार्चअखेर बिल अदा करण्यात आले. स्थापत्य विभागासाठी 1052 कोटी रुपये खर्च झाला. तर त्याखालोखाल आरोग्यसाठी 309 कोटी 16 लाख, भांडार विभागातील ठेकेदारांना 276 कोटी 16 लाख रुपये तर पाणीपुरवठा विभागासाठी 295 कोटी रुपये खर्च झाला.
शहरामध्ये इंदोर पॅटर्न राबवण्यात येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येत आहे. रंगरंगोटी तसेच स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे यंदा 309 कोटी 16 लाख रुपयांचा खर्च आरोग्य या विभागावर झाला आहे. तसेच विद्युत विभागासाठी 111 कोटी 72 लाख व पर्यावरण विभागासाठी 37 कोटी 77 लाख रुपये खर्च झाला आहे. 2021 -22 या अर्थिक वर्षामध्ये सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. त्यापैकी 2 हजार 364 कोटी रुपयांचे मार्चअखेर बिल अदा करण्यात आले आहे. तर महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या पगारावर सुमारे 850 कोटी रुपये खर्च होतो.
वैद्यकीयसाठी दोनशे कोटींची बिले
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मार्च 2020 पासून करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांसाठी मोठ्या सोयीसुविधा उभारण्यात आल्या होत्या. कोविड केअर सेंटर, औषधे, नवीन रुग्णालयांमध्ये संसाधने खरेदी करण्यात आली. तसेच सन 2020-21 या अर्थिक वर्षामध्ये उभारलेल्या सोयी-सुविधांची बिले देखील या अर्थिक वर्षामध्ये देण्यात आली आहेत. वैद्यकीय विभागावर 101 कोटी 47 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तर वायसीएम रुग्णालयासाठी 101 कोटी रुपये खर्च झाला आहे.