जोरदार पाऊस होऊनही जिल्ह्यात 250 टॅंकर!

बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांना कोरड

पुणे – जिल्ह्यात मागील दहा दिवसांत जोरदार पाऊस झाला. मात्र, अजूनही अनेक गावांमध्ये पुरेशा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील 4 लाख 17 हजार नागरिकांची तहान टॅंकरद्वारे भागविली जात आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि शिरूर तालुक्‍यात टॅंकरची संख्या अधिक आहे.

गतवर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुणे जिल्ह्यात ऑक्‍टोबरपासून बारामती आणि पुरंदर तालुक्‍यात टॅंकर सुरू झाले. पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी गावात तालुक्‍यातील पहिला टॅंकर सुरू करण्यात आला होता. मात्र, दिवसेंदिवस पाण्याची तीव्रता वाढल्यामुळे टॅंकरची संख्याही झपाट्याने वाढली. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल 335 टॅंकरने सहा लाखांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, जूनच्या शेवटी पावसाने हजेरी लावली आणि जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली. त्यामुळे मागील 15 दिवसांत 100 टॅंकर कमी झाले असून खेड, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा या ठिकाणी असलेले टॅंकर बंद करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

परंतु, हा पाऊस जिल्ह्यातील काही भागातच पडला असून जुलैचे पंधरा दिवस संपत आले, तरीही बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि शिरूर या तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये पाऊसच झाला नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, यंदा पाणीटंचाईच्या सुरुवातीला बारामती तालुक्‍यांत सर्वाधिक टॅंकरची संख्या होती. मात्र, त्यापेक्षा इंदापूर तालुक्‍यात पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य अधिक निर्माण झाल्याने सध्या जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर या तालुक्‍यात सुरू आहेत. सध्या इंदापूर तालुक्‍यामध्ये 69 टॅंकरने 46 गावांना पाणीपुरवठा होत आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस झाला, तर जिल्ह्यातील टॅंकरची संख्या झपाट्याने कमी होईल. तसेच सरासरी पाऊस झाला, तर पुढील उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्रता नक्कीच कमी असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.