पिंपरी (प्रतिनिधी) – पर्यावरण संर्वधनासाठी एक पाऊल उचलत थेरगाव येथील सम्राट मित्र मंडळाने लॉकडाऊनच्या कालावधीत 250 देशी झाडांची रोपे तयार केली आहेत. जुलै महिन्यात ही रोपे थेरगाव येथील पवना नदीपात्राजवळ लावण्यात येणार आहे. तसेच, संबंधित झाडांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने प्रत्येक संस्थेला दहा झाडे दत्तक दिली जाणार आहेत. “वर्क फ्रॉम होम’मुळे कामावर जाण्या-येण्याचा उरलेला वेळ तरुणांनी बियांची लागवड करुन रोपे तयार करण्यासाठी वापरला.
थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे शाळेजवळ ही रोपे बनविण्यात आली आहेत. तरुणांनी पिशव्यांमध्ये माती भरुन त्यामध्ये बियांची लागवड केली.त्यासाठी “निसर्गराजा मैत्र जीवांचा’ या संस्थेचे माणिक धर्माधिकारी, राहुल घोलप यांनी मार्गदर्शन केले. वृक्षारोपण करताना केवळ शोभेची झाडे लाऊन फायदा होत नाही. त्यामुळे संबंधित तरुणांनी शोभेची झाडे न लावता देशी झाडांची रोपे तयार केली आहेत. शिस, बकुळ, चिंच, बोर, शिंदी, करंज, आपटा, रोहतक आदी विविध झाडांच्या रोपांचा त्यामध्ये समावेश आहे.
पर्यावरण संवर्धनावर बोलताना त्याबाबत कृतीशील सहभाग देखील महत्त्वाचा आहे. याच भूमिकेतून “वर्क फ्रॉम होम’ करतानाच आम्ही तरुणांनी देशी झाडांची 250 रोपे बनविली. तिसऱ्या लॉकडाऊनपासून हे काम सुरू केले. जुलै महिन्यात आम्ही ही रोपे थेरगाव स्मशानभूमीजवळील पवना नदीपात्राजवळ लावणार आहोत. त्या वेळी विविध संस्थांना निमंत्रित करून त्यांना प्रत्येकी 10 झाडे दत्तक घेण्यासाठी सांगणार आहोत. त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाचे कामही होऊ शकेल.
– नीलेश पिंगळे, सम्राट मित्र मंडळ.