गणेश कला क्रीडा मंच परिसरात कडक बंदोबस्त
पुणे – एल्गार परिषदेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस स्टेशन, असा तब्बल 250 अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. तर, दुसरीकडे परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी फक्त 200 कार्यकर्त्यांची मर्यादा घालण्यात आली.
पोलिसांनी एल्गार परिषदेला गणेश कला क्रीडा मंच येथे परवानगी दिली. यानंतर तेथे कडक बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एल्गार परिषदेच्या आयोजकांनी 31 डिसेंबर 2020 रोजी कार्यक्रम करण्यास परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी नवीन वर्ष व कोरेगाव भीमा बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचे स्पष्ट केले होते.
यानंतर निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेला परवानगी मिळावी, असा अर्ज स्वारगेट पोलिसांकडे दिला होता. त्यानंतर 30 जानेवारीला काही अटी व शर्थी घालून परिषदेला परवानगी देण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीसह फक्त 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले.
एल्गार परिषदेमुळे बंदोबस्ताची जबाबदारी विभागातील सर्व पोलीस ठाण्यांवर होती. गुन्हे आणि विशेष शाखेचे कर्मचारीही यात सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी शुक्रवारी रात्रीच बंदोबस्ताचा आढावा घेतला.
उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाने परिषदेच्या नियोजित स्थळाची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून श्वानपथकाकडून परिसर पिंजून काढण्यात आला. गणेश कला क्रीडा मंचाच्या बाजूच्या रस्त्यांवरील वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी वाहतूक बदलाचे नियोजन केले. तर गुन्हे अन्वेषणचे उपायुक्त बच्चनसिंग, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे यांनी बंदोबस्ताच्या नियोजनात जातीने लक्ष घातले होते. राज्य गुप्तचर विभाग राज्य व केंद्रीय गुप्तचर विभागही परिषदेवर लक्ष ठेवून होते.
यामुळे कडक बंदोबस्त…
शनिवारवाड्याच्या प्रांगणात 31 डिसेंबर 2017 मध्ये एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.1 जानेवारी 2018ला भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत वाद होऊन हिंसाचार झाला होता. एल्गार परिषदेमुळे हिंसाचार भडकला होता, असा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याकरिता या परिषदेला कडक बंदोबस्त ठेवला. तसेच, करोनाचा संसर्गामुळे परिषदेला परवानगी नाकारली होती, यातून परिषदेचे संयोजक निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.