पुणे – पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या चिंचवडमधील तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. तरुणाकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. (Fake notes seized In Pune)
निलेश हिरानंद वीरकर (वय ३३, रा. विष्णू गावडे चाळ, चिंचवड रेल्वे स्थानकासमोर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने बनावट नोटा कोठून आणल्या, यादृष्टीने तपास सुरु आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल पवार, महेश मंडलिक गस्त घालत होते. त्यावेळी पीएमपी थांबा परिसरातून वीरकर गडबडीत निघाला होता. पवार आणि मंडलिक यांना संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरु केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या. चौकशीत नोटा बनावट असल्याचे आढळून आले.
वीरकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पद्मनाळे यांनी ही कारवाई केली.