अकोला – अनेकदा अशा काही घटना घडतात की त्यावर सहजासहजी विश्वास ठेवता येत नाही. अशीच एक घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा या गावात घडली आहे. येथील अंत्ययात्रेदरम्यान मृत तरूण चक्क तिरडीवर उढून बसला. नंतर तो इतरांशी गप्पाही मारत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विवरा गावातील प्रशांत मेसरे (वय 25) हा काही दिवसांपासून आजारी होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी बुधवारी घोषित केले. त्यानंतर त्याला घरी आणून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. नंतर त्याला अग्नी देण्यासाठी स्मशानभूमित घेऊन जात असताना वाटेतच तो अचानक तिरडीवर उठून बसला.
या घटनेमुळे जिल्ह्यात उलटसूलट चर्चांना उधाण आले आहे. अनेकजण हा चमत्कारच असल्याचे सांगत आहे. मात्र डाॅक्टरांना योग्य तपासणी न करता मृत घोषित केल्याचेही बोलले जात आहे. मात्र अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना तरूण तिरडीवर उठून बसल्याची घटना तर घडली आहे. ही घटना सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे.