लोगार (अफगाणिस्तान्) – अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील लोगार प्रांतात गेल्या 24 तासांत दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये 25 दहशतवादी ठार झाले आणि अन्य 18 दहशतवादी जखमी झाले. प्रांतीय पोलीस प्रमुखांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
बराकी बराक जिल्ह्यामधील पूल ए आलम आणि ताकी काला भागातील शौकर काला परिसरात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नाक्यांवर हल्ला चढवला. यावेळी झालेल्या जोरदार धुमश्चक्रीमध्ये 25 दहशतवादी ठार झाले.
त्यामध्ये काही महत्त्वाचे म्होरकेही ठार झाले आणि 18 दहशतवादी जखमी झाले, असे पोलीस प्रवक्ते शापूर अहमदजाई यांनी सांगितले.
अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी या चकमकीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला, असेही पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. या चकमकीबाबत तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.