नवी दिल्ली -उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 586 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यापैकी 147 जणांविरोधात म्हणजेच सुमारे 25 टक्के उमेदवारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
संबंधित उमेदवारांनी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रे सादर केली. त्यांची छाननी उत्तर प्रदेश इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थांनी केली. त्या संस्थांनी गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांविषयीचा अहवाल जारी केला. त्यानुसार, 19 टक्के म्हणजे 113 उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. समाजवादी पक्षाच्या सर्वांधिक 35 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. ते प्रमाण त्या पक्षाच्या एकूण उमेदवारांमध्ये 67 टक्के इतके आहे. त्याखालोखाल कॉंग्रेसचा क्रमांक लागला आहे. त्या पक्षाच्या 23 उमेदवारांविरोधात (43 टक्के) गुन्ह्यांची नोंद आहे. बहुजन समाज पक्षाच्या 36 टक्के, भाजपच्या 34 टक्के, तर आम आदमी पक्षाच्या 14 टक्के उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात नशीब आजमावत असलेले 260 उमेदवार करोडपती आहेत. उमेदवारांचे ते प्रमाण सुमारे 45 टक्के इतके आहे.