पाटण -पाटण विधानसभा मतदार संघातील जनतेला सार्वत्रिक सुविधा देणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे. राजकीय शो करण्यापेक्षा येथील प्रत्येकी व्यक्तींचा जीव माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. याकरिता आम्ही स्वतः व आमच्या संस्थाच्या माध्यमातून पाटण करोना केअर सेंटरसाठी 25 ऑक्सिजन बेड, त्यासाठी लागणारे पाइपिंग, 25 फोल्डिंग बेड, 25 नवीन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर दिले असल्याचे सत्यजित पाटणकर यांनी सांगितले.
दरम्यान, महामारीच्या काळात यापुढेही आमचे प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य रहाणारच आहे. आम्ही जे केले ते कोणावर उपकार म्हणून केले नाही. तर या मतदारसंघाप्रती असणाऱ्या दायित्व भावनेतून केलं आहे. त्यामुळे यापुढे ऑक्सिजन अभावी कोणाचाही दुर्दैवी मृत्यू होवू नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना सत्यजित पाटणकर यांनी उपस्थित
अधिकाऱ्यांना दिल्या.
पाटण येथील समाजकल्याण विभागाच्या नूतन वसतीगृहातील करोना केअर सेंटरला देण्यात आलेल्या 25 ऑक्सिजन बेड लोकार्पण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत यादव, पाटण अर्बन बॅंकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव.
श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव क्षीरसागर पाटण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, नगरसेवक अजय कवडे, दीपक शिंदे, किरण पवार, सचिन देसाई, दूध संघाचे व्यवस्थापक शिवाजी सुर्यवंशी, दत्तात्रय पाटील उपस्थित होते. यावेळी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन आपआपल्या कुटुुंबाची काळजी घ्यावी, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सत्यजित पाटणकर यांनी केले.