25 खासदार आढळले करोनाग्रस्त !

खासदारांच्या तपासणीतून झाले उघड

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही सभागृहातील खासदारांची करोना टेस्ट केली गेली. त्यात एकूण 25 खासदार करोनाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यातील 17 खासदार लोकसभेतील तर 8 खासदार राज्यसभेतील आहेत. या प्रकारमुळे अधिवेशनाला उपस्थित असलेल्या खासदारांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

काल आणि आज असे दोन दिवस संसद भवनाच्या आवारात या करोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. लोकसभेतील करोनाग्रस्त खासदारांमध्ये सर्वाधिक 12 करोनाग्रस्त खासदार भाजपचे आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे एकूण 785 खासदार आहेत. त्यापैकी सुमारे 200 खासदारांचे वय 65 पेक्षा अधिक आहे.

खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनाहीं काहीं दिवसांपुर्वी करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते तसेच काही केंद्रीय मंत्र्यांनाही हा विकार जडल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही या अभुतपुर्व परिस्थितीत संसद अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने खासदार उपस्थित आहेत. याचा अर्थ या लोकप्रतिनिधींची लोकशाही प्रति कर्तव्याचीच भावना दिसून आली आहे अशी प्रतिक्रीया लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिली आहे.

अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या सर्व खासदारांना डीआरडीओ कडून करोना किट देण्यात आले असून त्यात मास्क, फेसशिल्ड पासून अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.