पाडळी रांजणगाव ते देवदैठण रस्त्यासाठी 25 लाख मंजूर 

सुपा  -पारनेर तालुक्‍यातील पाडळी रांजणगाव ते देवदैठण रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी दिली. याबाबत दैनिक प्रभातने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता.

तालुक्‍याच्या दक्षिण सरहद्दीवर पारनेर व श्रीगोंदा या दोन तालुक्‍यांना जोडणारा व पाडळी रांजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डा, सारोळा सोमवंशी, चांभुर्डी, विसापूर आदी गावांना शिरूर-पुणे-श्रीगोंदा येथे जाण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थी, शेतमाल वाहतूक व इतर वाहतुकीसाठी प्रमुख असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी अनेक वर्षांची मागणी होती. या रस्त्यावर खाचखळगे वाढल्याने ग्रामस्थांना पायी चालणे कठीण झाले होते, तर वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. याबाबत दैनिक प्रभातने वेळोवेळी आवाज उठवला होता.

अखेर आमदार नीलेश लंके यांनी पाठपुरावा केल्याने त्यासाठी 25 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आतापर्यंत दोन्ही तालुक्‍यांतील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्षच केले होते. लंके यांनी आमदार झाल्यावर प्राधान्याने हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शब्द पाडळी रांजणगाव ग्रामस्थांना दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.