पुणे- करोना आपत्तीत कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पुणे महापालिकेच्या 17 कोविड योद्ध्यांच्या वारसांना लवकरच 25 लाख रुपयांची मदत आणि नोकरी देण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
वारंवार पत्रव्यवहार करूनही केंद्र सरकारच्या विमा योजनेतून 50 लाखांची विमा रक्कम मिळण्याला विलंब होत असल्याने, महापौर यांनी पक्षनेत्याच्या बैठकीत महापालिकेने जाहीर केलेली 50 लाख रुपयांची मदत तात्काळ देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. याबाबतचे पत्र महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाकडे सोमवारी प्राप्त झाल्याने, त्याबाबतचा 17 जणांचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
त्या सर्वांच्या वारसांनी नोकरीची मागणी केली आहे, त्यामुळे येत्या आठवड्यात त्यांना 25 लाख आणि नोकरीचे पत्र त्यांना मिळू शकणार आहे. मात्र केंद्राकडील विमा रक्कम मिळण्याबाबत साशंकत निर्माण झाली आहे. कोविड योद्धे म्हणून कर्तव्य बजावताना निधन झालेल्या सेवकांचा केंद्र सरकारने 50 लाख रुपयांचे विमा कवच दिले आहे.
या विमा रक्कमेसाठी महापालिकेने 11 जणांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले आहेत. मात्र ते अद्याप मंजूर न झाल्याने ही रक्कम कधी मिळेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.