लोणावळा नगरपरिषदेला 25 कोटींचे पारितोषिक

स्वच्छ सर्वेक्षण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरपरिषदेचा सन्मान

लोणावळा – केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 आणि 2019 स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करीत राष्ट्रीय पातळीवर अनुक्रमे पाचवा आणि दुसरा क्रमांक पटकावत भरीव कामगिरी करणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी लोणावळा नगरपरिषदेला पारितोषिकाचा 25 कोटी रुपयांचा निधी देखील देण्यात आला.

राज्य सरकारच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2018 आणि 2019 या स्पर्धेमध्ये उत्तम काम करून यश मिळविलेल्या नगरपालिकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये राष्ट्रीय पातळीवर पश्‍चिम विभागात पाचवा, तर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक प्राप्त झाला होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेला या कामगिरीसाठी अनुक्रमे 10 कोटी आणि 15 कोटी रुपये असे एकूण 25 कोटी रुपयांचे बक्षीस निधी देण्यात आला.

लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, आरोग्य समिती सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती पूजा गायकवाड, ब्रिंदा गणात्रा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हे पारितोषिक स्वीकारले. या वेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. नगरपरिषद प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.