राहुरी (प्रतिनिधी) – शहर व तालुक्यात करोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून काल तालुक्यात 16 तर आज नऊजण करोनाबाधित आढळले. दोन दिवसात करोना बाधितांची संख्या पंचवीसने वाढली आहे.
आज बारागांव नांदुर येथील 8 तर गुहा येथील 1 महिला करोनाबाधित आढळले. हे सर्व रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या शतक ओलांडून दिड शतकाकडे झपाट्याने वाढत आहे.
तालुक्यात काल एकाच दिवशी 16 नवे करोनाबाधित आढळले. ही संख्या तालुक्यात एका दिवसातील उच्चांकी आहे. तालुक्यात जेथे रुग्ण आढळून आले. त्या परिसरात प्रशासनाच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. यावेळी नगरपरिषदेचे सहाय्यक कर निरिक्षक काकासाहेब शिरसाठ, आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र पवार, बांधकाम विभाग प्रमुख बाबासाहेब गुंजाळ तसेच अफजल पठाण, नरेंद्र मोरे, राहुल जाधव, कुणाल अमृत, सागर जगधने आदी उपस्थित होते.