काम सुरू : दैनिक “प्रभात’ने अनेकवेळा केला आहे पाठपुरावा
पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात आता सीसीटीव्हीद्वारे “वॉच’ राहणार आहे. न्यायालयातील प्रवेशद्वारांबरोबर आतील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी न्यायालयाच्या परिसरामध्ये सुमारे 246 सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून, या कामाला सुरूवात झाली आहे. येथे सीसीटीव्ही बसवण्याबाबत पाठपुरावा करण्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ने अनेकवेळा प्रसिद्ध केले आहे.
शिवाजीनगर जिल्हा न्यायालय अतिरिकेच्या हिटलिस्टवर असल्याचे गुप्तचर यंत्रणेच्या तपासात निष्पन्न झाले होते. येथे माओवादी, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासह खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, अत्याचार, डीएसके प्रकरणासह अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची महत्त्वाचे प्रकरणे सुरू आहेत. मोक्काचे विशेष न्यायालय येथे असून, येथे पुणे विभागातील विविध जिल्ह्यातील मोक्का प्रकरणातील आरोपींना सुनावणीसाठी न्यायालयात आणले जाते. त्या आरोपींचे नातेवाईक, पाठीराखे मोठ्या प्रमाणात न्यायालयात येतातात. पाठीमागे न्यायालयाच्या आवारात जीवे ठार मारण्याच्या घटना घडल्या आहेत. दिवाणी, फौजदारी खटल्याच्या सुनावणीच्या निमित्ताने येथे हजारो वकील आणि पक्षकार दररोज येतात.
काही न्यायालयांच्या प्रवेशद्वारांवर बसवण्यात आलेले मेटल डिटेक्टर मशिन आहेत. मात्र, त्या नावापुरत्याच असून, पोलिसांची संख्याही कमी आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे होते. आता सीसीटीव्हीमुळे न्यायालयातील अनुचित प्रकरांवर आळा घालता येणे सोपे होणार आहे.
शिवाजीनगर न्यायालयात सीसीटीव्ही बसवण्यास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. तूर्तास न्यायालयाच्या तीन क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. यानंतर चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात येणार आहेत. न्यायालय आवारात सीसीटीव्ही कुठे बसायचे, याबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीशांसोबत बैठक झाली आहे. लवकरच काम अधिक गतीने सुरू होईल.
– ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन.
न्यायालय आवारात वकील, आरोपींवर हल्ला झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्हींमुळे अनुचित प्रकरांना आळा बसणार आहे. न्यायालयाच्या महत्त्वाच्या भागांमध्ये हे सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून, याचे रेकॉर्डिंग पोलीस आयुक्तालयामध्ये होणार आहे.
– ऍड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुुणे बार असोसिएशन.