2417 शाळांना मिळणार वाढीव अनुदान

नवयुग शिक्षक संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख सागर हिरवे यांची माहिती

पेठ- महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागासाठी राज्यातील 2 हजार 417 शाळांना वाढीव अनुदान टप्पा देण्याच्या हालचाली सुरु आहे. यामुळे राज्यातील 28 ते 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नवयुग शिक्षक संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख सागर हिरवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिली आहे.

याबाबत सागर हिरवे यांनी म्हटले आहे की, 28 ते 30 हजार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 20 टक्के टप्पा अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने चार एप्रिलला पत्र काढून त्याबाबतची सर्व माहिती प्रत्येक जिल्ह्यातून मागवली आहे. शिक्षण विभागाने माहितीमध्ये शाळेचे नाव, यु-डायस क्रमांक, शाळा अनुदानास घोषित झालेला शासन निर्णय, अनुदान घोषित केलेल्या तुकड्या, शासन निर्णयानुसार मान्य पदे, 20 टक्‍कांनी हॉट असलेला खर्च, वाढीव 40 टक्के दराने होणारा अपेक्षित खर्च, सरल बायोमेट्रिक प्रणाली, 100 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, रोस्टर अद्यावत आहे का? प्रयोग शाळा आहे का? या सर्व गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील शाळांची ही माहिती 20 एप्रिलपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्यात आघाडीचे सरकार असताना तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी कायम विनानुदानित तत्वावर शाळांना परवानगी देण्याचे धोरण आणले होते. त्यानंतर अघाडी सरकारने 2009 मध्ये कायम शब्द वगळून शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सदर अनुदान दिले नाही. 2014 मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यानी दोन हजार 417 शाळांना व तीन हजार 142 तुकड्यांना 20 टक्के टप्पा अनुदान मंजूर करण्याचा आदेश पूर्वीच दिला आहे. त्याचा फायदा राज्यातील जवळजवळ 28 ते 30 हजार शिक्षकांना होत आहे. आता पुढील टप्प्यासाठी माहिती मागवली आहे, अशी माहिती सागर हिरवे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.