सॅन दिएगो – मेक्सिकोच्या अमेरिकन दूतावासातील एका माजी कर्मचाऱ्याने तेथील सुमारे 24 महिलांवर त्यांना मादकद्रव्यांचे सेवन करायला लावून त्या बेशुद्ध झाल्यावर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघडकीला आली आहे.
ब्रायन जेफ्री रेमंड असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. यावर्षी जून महिन्यात तो आपली नोकरी सोऊन सॅन दिएगो येथे राहायला गेला आहे. त्याला तेथ जाऊन अटक करण्यात आली आहे.
31 मे रोजी एका महिलेवर त्याने अशाच प्रकारे अत्याचार केल्यानंतर त्याच्यावर त्या प्रकरणात गुन्हा नोंदवून खटला दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याने अशाच प्रकार अन्यही महिलांवर अत्याचार केल्याची बाब नमूद करण्यात आली होती. मेक्सिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर अमेरिकेच्या एफबीआयने हे प्रकरण तपासासाठी हातात घेतले.
या इसमाच्या उपकरणांमध्ये महिलांचे नग्न स्वरूपातील चारशेहून अधिक फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. महिलेला आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर तो त्यांना मादकद्रव्ये द्यायचा त्याने सदर महिला बेशुद्ध झाली की तो त्यांचे नग्न फोटो व व्हीडिओ काढायचा तसेच त्यांच्यावर तो अत्याचार करायचा.
त्याने अशा प्रकारे एकूण 24 महिलांवर अत्याचार केल्याचे पुरावे आम्हाला सापडले आहेत, असे अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याच्या रूबाबदार राहणीमानामुळे अनेक महिला त्याच्याकडे सहज आकर्षित होत. त्याला स्पॅनिश आणि चिनी भाषा अत्यंत सफाईने बोलत येत असे. सध्या तो सॅन दिएगोच्या कारागृहात असून त्याच्या विरोधातील पुढील खटल्यांची सुनावणी डिसेंबर महिन्यापासून वॉशिंग्टन येथे होणार आहे.