24 शिक्षकांना गैरवर्तन पडले महागात

हंगामी शिक्षकांवर महापालिकेची कारवाई : भरतीचा तिढा वाढला

पुणे – महापालिकेच्या शाळांसाठी हंगामी शिक्षक म्हणून काम करताना केलेले गैरवर्तन 24 शिक्षकांना चांगलेच महागात पडले आहे. पुन्हा नव्याने चालू शैक्षणिक वर्षात या राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत या सर्व शिक्षकांना महापालिकेच्या शिक्षण विभागाने अपात्र ठरविले आहे. त्यामुळे या शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे.

मात्र, आता या शिक्षकांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून हट्ट केला जात असल्याने शाळा सुरू होऊन महिना झाला तरी, ही भर्ती प्रक्रियाच रखडली असल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या बाजूला पालिका शाळांमधील मुख्याध्यापकांच्या गुरुवारी शिक्षण विभागात झालेली बैठकीत मुख्याध्यापकांनी हवे तर आम्हाला दोन शिक्षक कमी द्या, पण ज्या शिक्षकांविरोधात गैरवर्तनाच्या तक्रारी आहेत. त्यांना यावेळेस रुजु करून घेऊ नका, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या भर्तीचा तिढा आणखीनच वाढला आहे.

महापालिकेच्यावतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी शिक्षकांची संख्या कमी असल्याने 6 महिन्यांच्या कालावधीसाठी करार पद्धतीने हंगामी स्वरुपात शिक्षकांची भरती केली जाते. त्यानुसार प्रशासनाने यावर्षी अर्ज मागवून 128 पात्र शिक्षकांची यादी निश्‍चित केली आहे. त्यात जवळपास 24 शिक्षक गुणांमध्ये पात्र ठरत असतानाही प्रशासनाने या शिक्षकांना कामावर न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गैरवर्तनाच्या अनेक तक्रारी

याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे शिक्षक गतवर्षी पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, त्या कालावधीत काही शिक्षकांनी केवळ 1 ते 2 दिवस शाळेवरून येऊन ते गायब झालेले आहेत. तर काही शिक्षक इतर ठिकाणी जॉब करत असल्याचे, शाळा सुटण्याआधीच घरी जाणे, रजिस्टर पूर्ण न करणे, विद्यार्थ्यांचा निकाल न देणे अशा अनेक पद्धतीचे गैरवर्तन या शिक्षकांनी केले असल्याच्या तक्रारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची भरती करत असतानाच ज्या शिक्षकांविरोधात तक्रारी आल्या आहेत. त्यांना घेतले जाणार नसल्याचे प्रशासनाने भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीत स्पष्ट केले होते. त्यानुसार 24 शिक्षकांना भरती करून न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.