एसटीचा ताफा आणखी सक्षम : उत्पन्नही वाढणार
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ताफ्यात “शिवनेरी’च्या 24 नव्या बसेस दाखल झालेल्या आहेत. या बसेस पुण्यातून दादर, बोरिवली, ठाणे मार्गावर सोडण्यास सुरुवात केल्याची, माहिती एसटी महामंडळाने शुक्रवारी दिली.
शिवनेरीसोबत लालपरीच्या (साधी बस) तब्बल 100 नवीन बसेस ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. या बसेसचे ग्रामीण भागात संचलन सुरू करण्यात येणार आहे. सध्या पुणे-मुंबई-पुणेदरम्यान सुमारे 130 शिवनेरी बसेसच्या 300 फेऱ्या दररोज होतात. मात्र, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सोयीकरिता आणखी 24 शिवनेरी ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे, शिवनेरीच्या ताफ्यात आता 154 एवढी बसची संख्या झाली आहे.
एसटीच्या एकूण ताफ्यापैकी 0.7 टक्के एवढा वाटा शिवनेरी बसेसचा असून 2 टक्के महसूल शिवनेरी बसच्या फेऱ्यांमधून मिळतो. आता बसेसची संख्या वाढविल्याने एसटीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.