मुंबई- मेट्रोने 2013 पासून मालमत्ता कर थकवल्याने मेट्रोच्या 24 मालमत्ता मुंबई महापालिकेकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. इतकी वर्ष महापालिकेकडून वारंवार नोटीस देऊन सुध्दा मालमत्ता कर न भरल्याने पालिकेकडून मालमत्ता ताब्यात घेतल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
दिलेल्या मुदतीत मालमत्ता कर न भरल्यास मुंबईतल्या मेट्रोच्या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात येईल. तसेच त्यानंतर सुध्दा मेट्रोकडून पाऊल उचलले नाहीतर मलनिस्सारण वाहिनी सुध्दा बंद करण्यात येणार आहे. पालिकेकडून मेट्रोला 21 दिवसांचा कालावधी दिला असून रक्कम न भरल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या पालिकेने मुंबईतल्या मेट्रोच्या 24 मालमत्ता जप्त केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात कोणाला पैसे द्यायचे यावरून भांडण असल्यामुळे पैसे भरले जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यार्ड, कारशेड, स्टोअर बिल्डिंग, वर्कशॉप आणि इलेक्ट्रिक सबस्टेशन इत्यादी ठिकाणी महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे असे सहाय्यक महापालिका आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले. कर दिलेल्या मुदतीत न भरल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. मुंबईत सध्या सुरू असलेल्या मेट्रोचा प्रकल्प सार्वजनिक असल्याने या प्रकल्पाला मालमत्ता कर भरण्यापासून सुट देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत असे मेट्रोचे म्हणणे आहे.