मावळ तालुका : आदिवासी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
मावळ – आदिवासी क्षेत्रातील उपयोजना (ओटीएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत चालू वर्षी आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येणार आहे, मावळ तालुक्यासाठी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.
आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतर रोखणे यासाठी शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी संमती घेऊन त्यांची वैयक्तिक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार घेण्यात येतात. यामध्ये सलग समतल चर, कंपार्टंमेंट बंडिग, अनघड दगडी बांध, शेततळे, मजगी, जुने भात शेती दुरुस्ती व सामूहिक स्वरुपाचे माती नाला बांध, सिमेंट नाला बांध अशा विविध स्वरुपाचे उपचार घेण्यात येतात.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आदिवासी असल्याचा दाखला, सात बारा उतारा व आठ अ चा उतारा असे कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
याशिवाय विशेष घटक योजनेतंर्गत जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहे. आदिवासी योजनांतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी मावळ तालुक्यासाठी 14 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाचे आवाहन…
मावळ तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अन्य कायमस्वरुपी साधन नसते. त्यांचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता कृषी उत्पन्नात वाढ करण्यासाठी पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.