पुणे/हडपसर- पुण्यातील पेठांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होत असताना हडपसर परिसरासाठी 4 ते 5 तास पुरेशा दाबाने पाणी का पुरवले जात नाही, असा सवाल करून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत प्रशासन काय नियोजन करणार आहे, अशी विचारणा केली. यावर महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हडपसर परिसराचा पाणी पुरवठा दि. 18 सप्टेंबरपासून सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
हडपसर परिसरातील अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने खासदार डॉ. कोल्हे व आमदार चेतन तुपे यांनी रामटेकडी येथील पाण्याच्या टाकीची पाहणी करीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर व अन्य अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. अपुरा व अनियमित पाणी पुरवठा हा हडपसरच्या नागरिकांवर अन्याय असल्याचे सांगत आमदार तुपे तसेच हडपसरच्या नगरसेवकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हडपसरसाठी 40 एमएलडी पाणी कसे उपलब्ध करून देणार याचा निश्चित आराखडा सांगण्याचा आग्रह आमदार तुपे यांनी धरला. त्यानंतर विभागप्रमुख पावसकर यांनी दि. 18 सप्टेंबरपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर, आपण पुन्हा आढावा घेणार असल्याचे यावेळी डॉ. कोल्हे व आमदार तुपे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे, अशोक कांबळे, नाना भानगिरे, मारुती आबा तुपे, नगरसेविका हेमलता मगर, पूजा कोद्रे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, निलेश मगर, सुनिल बनकर आदी उपस्थित होते.