पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक बससेवा पुरवण्यात येत आहे. याशिवाय ‘पुष्पक’ या शववाहिनीची सेवा सुरू आहे. या सेवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संपर्क साधता येण्यासाठी पीएमपीकडून वायरलेस हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 9921960911 या क्रमांकाची सेवा 24 तास सुरू राहणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केल्याने शहरातील पीएमपी प्रवासी वाहतूक बंद ठेवली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांतील कर्मचार्यांसाठी ठराविक मार्गांवर बसेस सोडण्यात येत आहे. मृतांची ने आण करण्यासाठी पुष्पक ही शववाहीनी सेवा देखील देण्यात येत आहे.
नागरिकांकडून सध्या सुरू असणार्या सेवांबाबत महामंडळाकडे 020 – 24503200, 020 – 24503211, 020 – 24503212 क्रमांकांवर संपर्क साधून माहिती घेण्यात येत असून, बीएसएनएलच्या माध्यमातून प्रशासनाकडून हेल्पलाईन सेवा देण्यात येत होती. मात्र, सध्या शहरात सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे ठिकठिकाणी खोदाईचे काम सुरू आहे. यामुळे बीएसएनएलची सेवा वारंवार खंडीत होत आहे. परिणामी नागरिकांना संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर महामंडळाकडून स्वारगेट येथील मुख्यालयात पर्यायी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ही सेवा २४ तास सुरू राहणार असून, नागरिकांना माहिती घेता येणार आहे. यासह यापूर्वीचे संपर्क क्रमांक देखील सुरू राहणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.