नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्हयात करोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत करता यावा, यासाठी आता चोवीस तास कंट्रोल रुम कार्यान्वित करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी ही माहिती दिली.
करोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सध्या केवळ रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड मिळविणे, यासाठीच मोठी धडपड सुरु आहे. त्यांना येणार्या अडचणींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून ही वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात 24 बाय 7 , ही कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित राहणार आहे. (संपर्क : 0241-2322432) या कंट्रोल रुमसाठी नोडल अधिकारी म्हणून सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहाय्यक अधिकारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त कातकडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नगर जिल्हयातील करोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सीजन पुरवठा सुरळीत मिळणेकरीता या कंट्रोल रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी केले आहे.