करोना काळातही पुणे पालिकेचा निर्णय; 24 कोविड केअर सेंटर्स, विशेष कक्ष बंद

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश

पुणे – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी सुरू केलेले 24 कोविड केअर सेंटर आणि विविध कक्ष बंद केले आहेत. याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मूळ ठिकाणी रुजू होण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत महापालिकेच्या विविध कामांना गती मिळेल, अशी आशा आहे.

 

करोनाची संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने मार्चपासून विविध उपाययोजना सुरू केल्या. लॉकडाउनच्या काळात कामगारांच्या निवारा व्यवस्थापनापासून कोविड सेंटर, क्वारंटाइन सेंटरसह अन्य कामांसाठी विविध कक्ष उभारण्यात आले होते. तसेच कंटेन्मेंट झोन तयार करणे, स्वॅब सेंटर यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती मोठ्याप्रमाणावर करण्यात आली होती.

 

यामुळे या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या विभागाकडे पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या विभागांतील कामकाजावर त्याचा परिणाम झाला होता. दरम्यान रुग्णसंख्या वाढत असतानाच गंभीर रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइनचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही संस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी पुढे येत विलगीकरण कक्षही सुरू केले आहेत.

 

लॉकडाउन संपल्यानंतर विस्थापित कामगारांसाठीचे कक्ष बंद करण्यात आले आहेत. तसेच होम क्वारंटाइन सुरू झाल्यानंतर कोविड सेंटरही बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत असे तब्बल 24 कोविड सेंटर आणि विविध कक्ष बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मूळ विभागात रूजू करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.