पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण योजना राबविण्यासाठी महापालिकेकडून केंद्र शासनाकडे अमृत २ योजनेअंतर्गत सुधारीत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानुसार १६ गावांसाठी सुमारे १४६८ कोटींचा खर्च येणार असून, त्यातील ५८१ कोटींच्या निधीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.
याशिवाय उर्वरीत ७ गावांचा समावेश शहराच्या मूळ हद्दीसाठी सुरू असलेल्या मुळा- मुठा नदी संवर्धन प्रकल्पात (जायका) मध्ये केला जाणार आहे. त्यासाठी सुधारीत आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार जायकाकडेही हा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महापालिकेत २०२१ मध्ये हद्दीजवळील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झालेले असले, तरी सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची कोणतीही सुविधा नाही, तसेच या गावांमधील अनेक नाले हे मुळा- मुठा नदीलाच येऊन मिळतात.
परिणामी, एका बाजूला जुन्या हद्दीसाठी जायका योजना सुरू असतानाच या गावांमध्ये कोणतीही यंत्रणा नसल्याने हे सांडपाणी पुन्हा नदी प्रदूषित करणारे ठरणारे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या २३ गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापनचा आराखडा केला आहे.
त्यानुसार १६ गावांमध्ये ड्रेनेजचे जाळे विकसित केले जाणार आहे, तसेच सुमारे दीडशे एमएलडी क्षमतेचे ४ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत. उर्वरीत ७ गावांचा समावेश जायका योजनेत केला जाणार आहे. या गावांचा अर्धा भाग आधीच महापालिकेत आलेला असून, ती गावे नदीच्या जवळ आहेत. त्यामुळे जायका योजनेत प्रकल्प क्षमता वाढविण्यासाठी महापालिकेचे नियोजन असून, त्याबाबतचा प्रस्तावही जायकासमोर ठेवण्यात आला आहे.
अमृत योजनेतून निधीची मागणी
महापालिकेस केंद्र शासनाने अमृत २ योजनेत निधी देण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिकेने ५३४ कोटींच्या निधीची मागणी केंंद्राकडे केली होती. मात्र, केंद्र शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दरानुसार सुधारीत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालिकेस केल्या होत्या.
त्यानुसार पालिकेने सुधारीत प्रस्ताव तयार केला असून, आता ५८१ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. उर्वरीत खर्च महापालिका करणार असून, त्यासाठी कर्ज काढण्याबाबत अथवा अल्प व्याजदरात कर्ज मिळविण्यासाठीचे महापालिकेचे नियोजन आहे.