पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील अनधिकृत इमारतींमधील सदनिका तसेच बेकायदा प्लॉटिंगची दस्त नोंदणी केल्याप्रकरणी 44 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 11 दुय्यम निबंधकांचा समावेश आहे. दस्तनोंदणी कार्यालयाची मुख्य जबाबदारी ही दुय्यम निबंधकांवर असते.
या दोन्ही शहरात मिळून एकूण 27 दस्त नोंदणी कार्यालये आहेत. आता मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने 23 दस्त नोंदणी कार्यालयाची जबाबदारी लिपिकांवर देण्यात आली आहे. लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा प्रभारी पदभार देऊन दस्त नोंदणीचे काम पार पाडले जात आहे.
शासनाने 27 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील मागील तीन वर्षांत नोंदविलेल्या सुमारे एक लाख दस्तांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. थेट 11 दुय्यम निबंधकांसह वरिष्ठ लिपिकांवर कारवाई करण्यात आल्याने या कार्यालयांचा पदभार कनिष्ठ लिपिकांकडे सोपविण्यात आला आहे. उर्वरित 4 कार्यालयांची जबाबदारी दुय्यम निबंधकांकडेच आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला.
दुय्यम निबंधकांची जबाबदारी नको रे बाबा
नियमबाह्यपणे दस्त नोंदणी केलेल्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आल्याने याचा धसका नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याआधी दुय्यम निबंधक पदाचा पदभार घेण्यासाठी चढाओढ असायची. आता मात्र दुय्यम निबंधक कार्यालयाची जबाबदारी घेण्यास लिपिक तयार होत नव्हते. आता अखेर त्यांची मनधरणी करून त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.