चंडीगढ – पंजाबमधील 23 मंत्री आणि आमदारांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली आहे. त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ती माहिती कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत दिली.
नीट आणि जेईई परीक्षा घेण्यासाठी स्थिती अनुकूल नसल्याचे नमूद करण्यासाठी अमरिंदर यांनी संबंधित माहिती दिली. मंत्र्यांना आणि आमदारांना होणाऱ्या संसर्गामुळे स्थिती गंभीर असल्याचे सूचित होते, असे त्यांनी म्हटले. पंजाब विधानसभेचे अधिवेशन 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवरही अमरिंदर यांनी दिलेल्या माहितीला महत्व आहे. मात्र, करोनाबाधा झालेल्यांमध्ये नेमके मंत्री आणि आमदार किती ते समजू शकले नाही.