चाकूर – लातूर व जिल्हाभरात वन्यप्राण्याने धुमाकुळ घातला असून बिबट्यासारखे हिंस्र प्राणी सर्रास आढळून येत आहेत. चाकूर तालुक्यातील सांडोळ येथील एका आखाड्यावर असलेल्या शेळ्यांपैकी 23 शेळ्या काल रात्री हिंस्र प्राण्यांनी फस्त केल्या आहेत. या प्रकाराने शेळी मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मौजे सांडोळ, ता. चाकूर येथील शेळीपालन करणारे सुधाकर गोविंद जायभाये यांच्या मालकीच्या अनेक शेळ्या आहेत. काल दिवसभर त्यांनी या गावच्या शिवारात शेळ्या फिरविल्यानंतर रात्रीच्यावेळी आखाड्यावर त्या सर्व शेळ्या एकत्रितरित्या बंदीस्त केल्या. रात्री गावात प्रवचन असल्याने प्रवचन ऐकण्यासाठी ते आखाडा सोडून गावात आले.
दरम्यान, बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याने सुमारे 23 शेळ्यांच्या नरडीचा घोट घेतला. वन्यप्राण्याच्या या हल्ल्याने या शेळी पालकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या वन्यप्राण्याने बहुतेक सर्व शेळ्याच्या नरडीचा घोट घेतला असल्याने तो वाघ किंवा बिबट्या असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन्य विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देवून पंचनामा केला आहे.