23 मे रोजी गुजरातमधील भाजपचे सरकारही पडणार ! ज्येष्ठ नेते शंकरसिंग वाघेला यांचा दावा

अहमदाबाद – येत्या 23 मे रोजी देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी जेव्हा सुरू होईल तेव्हा पासून भाजपच्या पतनाला सुरूवात होईल. त्यादिवशी केंद्रातील भाजपचे सरकार पडेलच पण त्याच दिवशी गुजरातमधील भाजपचेही सरकार पडेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शंकरसिंग वाघेला यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून आम्हाला भाजप मध्ये वेठबिगारासारखे वागवले जात आहे अशी त्यांची सार्वत्रिक तक्रार आहे. आमच्या तक्रारींकडे कोणी लक्ष देत नाही, आम्हाला कोणी विचारतही नाही असे त्यांचे म्हणणे असून अशा नाराज आमदारांची संख्या सरकार पाडण्या इतकी मोठी आहे असे ते म्हणाले. वाघेला हे या राज्याचे माजी मुख्यमंत्रीही आहेत.

पुर्वी कॉंग्रेस मध्ये असलेले वाघेला 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी कॉंग्रेस मधून बाहेर पडले होते आता सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आहेत. नाराज भाजप आमदारांशी आपला सातत्याने संपर्क आहे असेही त्यांनी म्हटले आहे. तथापी राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांचा हा दावा फेटाळला आहे. वाघेला यांना अशी विधाने करून प्रसिद्धीत राहण्याची सवयच आहे असे भाजपने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.