बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार असून अनेक नामवंत खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहेत. बर्मिंगहॅममध्ये भारतीय क्रीडा चाहत्यांकडून भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत झाले. बर्मिंगहॅम येथील भारतीय उच्चायुक्तालयाने खेळाडूंना चिअर करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा भारताचा ध्वजवाहक म्हणून देशाचे नेतृत्व करणार होता; परंतु दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याने ही संधी गमावल्याबद्दल त्याने निराशा व्यक्त केली आहे.
सिंधू भारताची ध्वजवाहक
दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची गुरुवारी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय दलाची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली. गोल्डन बॉय नीरज चोप्राने माघार घेतल्याने भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सिंधूला ध्वजवाहक म्हणून निवडले. यासाठी मीराबाई चानू आणि बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन यांच्या नावाचाही विचार करण्यात आला होता. दरम्यान, गोल्ड कोस्टमध्ये 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू ध्वजवाहक होती.
या स्पर्धेत गतविजेत्या विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व 12 कुस्तीपटूंकडून सुवर्ण कामगिरी अपेक्षित आहे. गोल्ड कोस्टमध्ये कुस्तीपटूंनी पाच सुवर्णांसह 12 पदके जिंकली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास कुस्तीपटू सज्ज आहेत. याशिवाय ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूकडूनही पदकाची अपेक्षा आहे.
“बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक हे अंतिम ध्येय आहे. सध्या, आम्ही ग्रुप स्टेजच्या सामन्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि ऑस्ट्रेलियाबद्दल अजिबात विचार करत नाही. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया हॉट फेव्हरिट आहे. पण भारतीयांना सुवर्णपदक मिळवायचे असल्यास त्यांना पराभूत करावे लागेल.”
– मनप्रीत सिंग(कर्णधार, भारतीय पुरुष हॉकी संघ)
बॅडमिंटनमध्ये सुपरस्टार पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखालील शटलर्सकडून महिला एकेरी, पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र सांघिक गटात पदक जिंकण्याची अपेक्षा असेल. या संघात वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेत्या किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचा समावेश आहे.
गतवर्षी ऑलिम्पिकमध्ये केलेल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघ ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी मैदानात उतरेल. तर टोकियो गेम्समध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या महिला हॉकी संघ टॉप-थ्रीमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
दरम्यान, गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचबरोबर भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2010साली झाली. त्यावर्षी भारत ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता.
ध्वजवाहकाची संधी गमावल्याने निराश – नीरज चोप्रा
नीरज चोप्राने सोशल मीडिया हॅंडलवर लिहिले की, माझ्या विजेतेपदाचे मी रक्षण करू शकलो नाही. तसेच राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची दुसरी संधी गमावल्याने मी दुखावलो आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात देशाचा ध्वजवाहक होण्याची संधी गमावल्याबद्दल मी विशेषतः निराश झालो आहे, या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहात होतो, असे चोप्राने लिहिले आहे. सध्या, मी दुखापतीतून बरे होण्यावर लक्ष केंद्रित केले असून लवकरच परत येण्याची आशा आहे. गेल्या काही दिवसांपासून मला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी संपूर्ण देशाचे आभार मानू इच्छितो. तसेच बर्मिंगहॅममध्ये माझ्या सहकारी ऍथलीट्सचा जयजयकार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत सामील व्हावे, अशी विनंती करतो. जय हिंद.