- परवानगीसाठी महापालिकेत येणाऱ्या प्रस्तावांचे प्रमाणही घटले
पिंपरी – करोनाचा फटका महापालिकेच्या बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नालाही बसला आहे. गतवर्षी एप्रिल ते ऑगस्ट अशा पाच महिन्यांच्या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा तब्बल 220 कोटी रुपयांची घट झाली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे आणि मंदीसदृश्य वातावरणाने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय, विविध गृहप्रकल्प, घरे आणि बंगल्यांसाठी बांधकाम परवानगी प्रस्तावांचे प्रमाणही सुमारे 75 टक्के घटले आहे.
महापालिकेला गेल्या आर्थिक वर्षात (2019-20) बांधकाम परवानगीतून तब्बल 651 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यामध्ये एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत 265 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. चालू आर्थिक वर्षात (2020-21) एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत आत्तापर्यंत केवळ 45 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजे गतवर्षी एप्रिल ते ऑगस्ट अशा पाच महिन्यांमध्ये मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा चालू आर्थिक वर्षातील पाच महिन्यांत 220 कोटी रुपयांनी उत्पन्न घटले आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आणि बांधकाम प्रकल्पांची कामे बंद असल्याने 18 मार्च ते 19 मे या कालावधीत बांधकाम परवानगीसाठी प्रकल्पांचे प्रस्तावच आले नाही. त्याशिवाय, रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचाही मोठा परिणाम बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर झाला आहे.
अवघ्या 252 बांधकामांना परवानगी
शहरातील विविध भागांमध्ये इमारती, बैठी घरे आणि बंगल्यांच्या बांधकामासाठी बांधकाम परवानगी मिळावी, यासाठी येणाऱ्या प्रस्तावांच्या प्रमाणात चौपट घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातर्फे एकूण 2 हजार 129 बांधकामांना परवानगी देण्यात आली. त्यामध्ये नवीन आणि सुधारित परवानगीचा समावेश आहे.
गतवर्षी 1 एप्रिल ते 9 सप्टेंबर या कालावधीत एकूण 999 बांधकामांना नवीन व सुधारित परवानगी देण्यात आली होती. तुलनेत यंदा 1 एप्रिल ते 9 सप्टेंबर या कालावधीत एकूण 252 बांधकामांना नवीन व सुधारित परवानगी देण्यात आली. दिघी, मोशी, रावेत, पुनावळे, ताथवडे, आकुर्डी, किवळे, मामुर्डी, पिंपरीगाव, दिघी, चिखली, पिंपळे गुरव, थेरगाव, रहाटणी, डुडुळगाव, निगडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, चऱ्होली, वाकड, दापोडी, भोसरी, सांगवी, वडमुखवाडी आदी परिसरांमध्ये ही बांधकाम परवानगी दिली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते ऑगस्ट अशा पाच महिन्यांमध्ये महापालिका बांधकाम परवानगीचे उत्पन्न घटले आहे. त्याशिवाय, नवीन आणि सुधारित बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या प्रस्तावांच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने केलेला लॉकडाऊन, काही महिने बंद असलेली प्रकल्पांची कामे आणि रिअल इस्टेट क्षेत्रात निर्माण झालेली मंदीसदृश्य परिस्थिती ही त्याची काही प्रमुख कारणे सांगता येतील.
– मकरंद निकम, सह-शहर अभियंता, महापालिका.