बंगळूरमध्ये तब्बल 22 दहशतवादी गट सक्रिय!

शहरासाठी स्थापणार स्वतंत्र एटीएस
बंगळूर : कर्नाटकची राजधानी बंगळूर शहरात तब्बल 20 ते 22 दहशतवादी गट सक्रिय असल्याचा संशय आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) सूचित करण्यात आलेल्या त्या माहितीची गंभीर दखल कर्नाटक सरकारने घेतली आहे. त्यातून त्या शहरासाठी स्वतंत्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) स्थापण्यात येणार आहे.

मागील वर्षभरात बंगळूरमध्ये आणि त्या शहरालगतच्या भागांत जमात-ए-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या काही सदस्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काही स्फोटके आणि आक्षेपार्ह सामग्रीही जप्त करण्यात आली. त्यामुळे तपास आणि सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या आहेत.

बंगळूरमध्ये पकडण्यात आलेले जेएमबीचे दहशतवादी पश्‍चिम बंगालच्या वर्धमानमध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांत सामील असल्याचे निष्पन्न झाले. त्या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण शिबिरे घेतली. त्याशिवाय, बंगळूरला अड्डा बनवून देशभरात दहशतवादी कारवाया घडवण्याचा त्यांचा कट असल्याची माहितीही समोर आली.

एनआयएकडून ती माहिती कर्नाटक सरकारला देण्यात आली. त्यामुळे फक्त बंगळूर शहरासाठी स्वतंत्र एटीएस स्थापण्याचा निर्णय त्या सरकारने घेतला. त्या एटीएसचे कामकाज 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. ते एटीएस दहशतवादी गटांना हातपाय पसरू न देण्यासाठी एनआयएशी समन्वय ठेऊन कार्य करेल. त्याशिवाय, बंगळूरमधील बाजारपेठा, मॉल, रेल्वे आणि बस स्थानके यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तान आणि त्या देशातील दहशतवादी संघटना बिथरल्या आहेत. त्यातून भारतात दहशतवादी हल्ले घडवले जाऊ शकतात, असा इशारा आधीच देण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच बंगळूरबाबत एनआयएने दिलेली माहिती अतिशय गांभीर्याने घेण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)