22 सिंधी समाजबांधव आता “भारतीय’

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आहेत वास्तव्यास

पुणे – पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याक असलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार भारतीय नागरिकत्व बहाल केले जात आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजनच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पाकिस्तानी सिंधी समाजातील 22 नागरिकांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले.

यावेळी गृह विभागाचे तहसीलदार हेमंत निकम, सिंधी समाजातील संत युधिष्ठिर लालजी, वीरेंद्र कुकरेजा, “मेरे अपने’ संघटनेचे बाळासाहेब रुणवाल आणि सिंधी समाज बांधव उपस्थित होते.

परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार यापूर्वी शासनाला होते. परंतु केंद्र सरकारने 1955 च्या भारतीय नागरिकत्व कायद्यात 2016 मध्ये सुधारणा केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देशाचे नागरिकत्व प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 22 नागरिकांना कायदेशीररीत्या भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. याबद्दल या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे भीतीपोटी आणि काम-धंद्यानिमित्त 500 पेक्षा अधिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नव्हते. ते मिळावे, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. यापूर्वी 40 पेक्षा अधिक नागरिकांना नागरिकत्व देण्यात आले आहे.

कागदपत्रे मिळविण्यास अडचणी
भारताचे नागरिकत्व नसल्याने त्यांना भारतात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मुळात भारतीय नागरिकत्व नसल्याने त्यांना इथल्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच रेशन कार्ड, आधार कार्ड यांसारख्या सुविधाही मिळत नव्हत्या, परंतु आता मिळण्याची मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नागरिकत्व देण्यासंबंधी कायदा होता. परंतु, त्याची अमंलबजावणी कशी पद्धतीने केली जाते याची माहिती नव्हती. त्यातच कायद्यामध्ये बदल केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकत्व देण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे बाळासाहेब रूणवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.