२०२० मध्ये सोन्याने दिला २२ टक्के परतावा

सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी 2020 हे वर्ष अधिक सोनेरी ठरले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत सोन्याचे दर वेगाने वाढून 59 हजार रुपयांपर्यंत गेले होते. जागतिक सोने बाजारात याकाळात सोन्याचे दर 2,050 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले होते. ऑगस्ट महिन्यानंतर जागतिक आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत मिळत असल्यामुळे सोन्याच्या दरातील चढ-उतार वाढत गेले. आता सोन्याचे दर जवळपास 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी वर्षात सोन्याबाबत काय निर्णय घ्यावा, यावर गुंतवणूकदार विचार करीत असण्याची शक्‍यता आहे. 

2020 च्या सुरुवातीला करोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. नियमित रोजगारावर परिणाम झाला. त्यामुळे अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी कशाचा आधार घ्यावा याचा अंदाज सर्वसामान्य लोकांना आणि गुंतवणूकदारांना येत नव्हता. त्यामुळे अशा अस्थिर परिस्थितीत परंपरेप्रमाणे बऱ्याच लोकांनी गुंतवणुकीसाठी सोन्याचा आधार घेतल्यामुळे या वर्षात सोन्याचे दर 22 टक्‍क्‍यांनी वाढले. ऑगस्ट महिन्यापासून परिस्थिती अंशतः सुरळीत होण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे सोन्यातील काही गुंतवणूक शेअर, कर्जरोखे, क्रुडसह इतर कमोडीटीज आणि चलन बाजाराकडे वळू लागली आहे. 2021 मध्ये परिस्थिती किती पूर्ववत होईल यावर सोन्यातील गुंतवणूक अवलंबून राहणार आहे.

अमेरिका, ब्रिटन या देशात लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे सोन्याच्या दरावर नकारात्मक पर्याय होऊ शकतो. अमेरिकेतील पुढील पॅकेज जाहीर होण्यास उशीर झाला आहे. 20 जानेवारीपर्यंत तरी व्हाइटहाऊस आणि अमेरिकन कॉंग्रेस दरम्यान पॅकेज जाहीर करण्याबाबत मतैक्‍य होण्याची शक्‍यता कमी आहे. याचा सोन्याच्या दरावर लघु पल्ल्यात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोन्याच्या दरात गेल्या काही आठवड्यापासून चढ-उतार होत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार 2021 वर्षाला सामोरे जात आहेत. बऱ्याच विश्‍लेषकांनी 2021 मध्ये सोन्याचे दर काही प्रमाणात तरी वाढत राहण्याची शक्‍यता व्यक्‍त केली आहे. यासाठी विश्‍लेषकांनी काही कारणे दिली आहे.
आर्थिक परिस्थिती चटकन पूर्वपदावर येणार नाही

2020 मध्ये अर्थव्यवस्थेला अचानक करोनाचा धक्‍का बसल्यानंतर विविध देशाच्या सरकार आणि रिझर्व्ह बॅंकांनी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अभूतपूर्व उपाययोजना केल्या. मात्र, तरीही विविध देशाचे विकासदर कोसळले. या काळात सोन्यातील गुंतवणूक वाढून सोन्याचे दर 22 टक्‍क्‍यांनी वाढले. आता वर्षभरात अर्थव्यवस्थेचा झालेला घसारा अचानक कमी होणे शक्‍य नाही. त्यामुळे मंदी 2021 मध्येही कमी-अधिक प्रमाणात रेंगाळण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दर क्रमावर राहू शकतात असे विश्‍लेषकांना वाटणे साहजिक आहे.

अमेरिकेसह विविध देशात पॅकेज देण्याबाबतही राजकीय नेत्यात रस्सीखेच चालू आहे. त्यातच ब्रेक्‍झिटचा तिढा आणखी गुंतागुंतीचा होणार आहे. अमेरिका-चीनचे संबंध पटकन सुरळीत होण्याची शक्‍यता नाही. या सर्व बाबींचा जागतिक अर्थव्यवस्थेवर जितका जास्त परिणाम होईल तेवढे सोन्याचे आकर्षण मूल्य वाढत राहण्याची शक्‍यता आहे.

लसीचे वितरण आणि परिणामकारकतेबाबत संदिग्धता
करोनावरील लस उपलब्ध झाली आहे. या लसीची उपलब्धता मर्यादित आहे. युरोप आणि अमेरिकेत लसीकरण होईल. मात्र, उरलेल्या जगाचे लसीकरण होण्यास एक वर्षापेक्षा अधिक काळ लागू शकतो. त्याचबरोबर ज्या लसी उपलब्ध आहेत त्यांची परिणामकारकता अजूनही संदिग्ध आहे आहे. अशा परिस्थितीत आरोग्यविषयक परिस्थिती खात्रीने पूर्वपदावर कधी येईल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. असा त्याचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम कायम राहील आणि सोन्याचे आकर्षण मूल्य कमी होणार नाही असे विश्‍लेषकांना वाटते.

पडत्या काळात आधार
शेअरबाजार, रोखे बाजार आणि इतर गुंतवणूक उत्पादनातील अस्थिरता वाढल्यानंतर सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ होत असते. अशा परिस्थितीत सोन्याचा उपयोग महागाईचा सामना करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून केला जातो. त्यामुळे अर्थव्यवस्था की कमकुवत राहील यावर सोन्याच्या दराचे भविष्य अवलंबून असेल.

… तर सोने माघार घेऊ शकते
ऑगस्टपर्यंत सोन्याचे दर वाढल्यानंतर आता ते बरेच कमी झाले आहेत. या काळात जागतिक पातळीवर गोल्ड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडातून 6.8 अब्ज डॉलरचे म्हणजे शंभर टन सोने काढून घेतले गेले. या फंडातील गुंतवणूक ज्या प्रमाणात कमी होईल त्या प्रमाणात सोन्याचे दर कमी होऊ शकतात.

बिटकॉइनचे आकर्षण
घसरणाऱ्या आर्थिक परिस्थितीत सेफ हेवन म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. मात्र, या क्षेत्रात आता सोन्याला बिटकॉइन स्पर्धक म्हणून निर्माण होऊ लागला आहे. बिटकॉइनला सर्वांची मान्यता मिळाली नसली तरी काही देशात बिटकॉइनमध्ये गुंतवणूक वाढत आहे. जर सेफ हेवन म्हणून जास्त गुंतवणूक बिटकॉइनकडे वळली तर सोन्याचे आकर्षणमूल्य कमी होऊ शकते.

अशा परिस्थितीत सोन्याबाबत 2021 मध्ये काय निर्णय घ्यावा, असा प्रश्‍न बऱ्याच गुंतवणूकदारांना सतावत असण्याची शक्‍यता आहे. सरलेल्या 2020 मध्ये पहिले सहा महिने सोन्याचे दर वेगात वाढल्यानंतर पुढील सहा महिन्यांत ती गती राहिली नाही. ऑगस्टनंतर गुंतवणूक बरीच कमी होऊनही सध्या गोल्ड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडात 3,700 टन सोन्याची गुंतवणूक झाली आहे. गोल्ड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडात इतकी गुंतवणूक दीर्घ पल्ल्यात कायम राहणे शक्‍य नाही. जर इतर गुंतवणूक क्षेत्र आकर्षक वाटू लागली तर गोल्ड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडात गुंतवणूक कमी होऊ शकते. त्याचे सोन्याच्या दरावर परिणाम अपरिहार्य आहे.

खरेदीसाठी कोणती पातळी योग्य ?
अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी जोखमीचे योग्य मूल्यांकन वेळोवेळी करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. एवढे मात्र खरे की सोन्याचे आकर्षण 2020 इतके निश्‍चित राहणार नाही. मात्र, ते पूर्णतः अंतर्धान पावणार नाही. अशा परिस्थितीत योग्य मूल्यांकन करून किती सोने आपल्या पार्टफोलीओत ठेवायचे याचा निर्णय गुंतवणूकदारांना घ्यावा लागणार आहे. काही विश्‍लेषक सोने 50 हजार पातळीच्या खाली राहिल्यास खरेदी करण्यास हरकत नाही, असे सुचवत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.