पुणे – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मधील आय.टी.विभागामार्फत दररोज इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १३ एप्रिल पासून ऑनलाइन स्वअध्ययन अभ्यास मालिका सुरु करण्यात आली आहे. आत्ता पर्यंत राज्यातील २२ लाख विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे उन्हाळी सुट्टीपूर्वी शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाइन अध्ययन अभ्यास मालिका राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
अध्ययनाचे दैनंदिन नियोजन करून दररोज इयत्ता निहाय प्रत्येक विषयातील दुसऱ्या सत्राच्या घटकाची एक लिंक विकसित करून व्हाटसअपच्या माध्यमातून राज्यातील सर्व विद्यार्थांना पुरविली जाते. लिंकच्या माध्यमातून दीक्षा अँपवरील त्याविषयातील घटकाचे ई -साहित्य मुलांसाठी उपलब्ध होते. यामध्ये घटकाला अनुरूप चित्रे, संवाद, व्हिडिओ, कृती व प्रश्नांचा समावेश असतो. मे महिना हा उन्हाळी सुट्टीचा कालावधी असल्याने २७ एप्रिल पासून ऑनलाइन स्वअध्ययन अभ्यासमालिकेत बदल करून सहशालेय उपक्रम व कृतीवर आधारित उपक्रमांची माहिती करून दिली जाते.
विद्यार्थ्यांना पूरक वाचनासाठी गोष्टीची पुस्तके, घरी करण्यासाठी कार्यानुभवाच्या छोट्या छोट्या कृती, स्पोकन इंग्लिश, संगीत नाटक ,गायन वादन, इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा तयारी इत्यादी बाबी मुलांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राज्यातील बहुसंख्य विद्यार्थीनी या ऑनलाइन स्वअध्ययन मालिकेचा फायदा घेतला असून १ कोटी १६ हजार इतक्या वेळा हे ई साहित्य पाहण्यात आले आहे. अभ्यासमाला विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेबाबत राज्यामधून अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आय.टी.विभागास प्राप्त होत असल्याबाबत उपसंचालक विकास गरड यांनी माहिती दिली आहे.