पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कंपनीला संचलन तुटीपोटी सुमारे 22 कोटी 50 लाख रुपये अदा करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. विलास मडीगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक सेवा चालविण्यासाठी दोन्ही महापालिका निधी पुरवितात. त्यात पुण्याचा 60 टक्के, तर पिंपरीचा 40 टक्के हिस्सा आहे. चालू आर्थिक वर्षात संचलन तूट, बस पासेस आणि बस खरेदी या गोष्टींसाठी एकूण 190 कोटी 82 लाख रुपये एवढा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हिस्सा दिला जाणार आहेत. त्यामध्ये संचलन तुटीपोटी 97 कोटी 82 लाख, बसपासेससाठी 18 कोटी आणि बस खरेदीसाठी 75 कोटी रुपयांचा समावेश आहे.
त्यापैकी प्रति महिना 7 कोटी 50 लाख रुपये पीएमपीला अदा केले जातात. मागील तीन महिन्यांचा े निधी मिळून 22 कोटी 50 लाख रुपये पीएमपीला देण्यास मंजुरी दिली. त्याबरोबर सुमारे 24 कोटी 35 लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये खेळाडू दत्तक योजनेअंतर्गत पात्र खेळाडूंना दत्तक योजना लाभापोटी 73 लाख रुपयांच्या खर्च मंजूर करण्यात आला. जेएनएनयूआरएम योजने अंतर्गत विकसित होणाऱ्या काळेवाडी ते देहु आळंदी रस्त्याच्या विकसनासाठी 45 मीटर रुंद रस्त्याच्या जागा संपादनासाठी येणाऱ्या 7 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.