पुणे {प्रभात वृत्तसेवा} – पर्वती विधानसभा मतदारसंघातून अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज केले आहे. आतापर्यंत एकूण २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.
पर्वती पायथा येथील सचिन तावरे यांनी अपक्ष म्हणून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ, अश्विनी कदम, आबा बागुल, सचिन तावरे हे चारही उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पर्वतीमधून निवडणूक लढण्यासाठी आतापर्यंत ४७ उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. त्यापैकी २२ उमेदवारांनी एकूण ३७ अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी सणस मैदान येथे असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. पोलिसांचा मोठा ताफा होता.