नवी दिल्ली – “डार्कनेट’ या विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशभरात चालवल्या जाणाऱ्या ड्रग रॅकेटचा “एनसीबी’ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर, एक वित्तीय विश्लेषक, “एमबीए’ पदवीधर आणि एका अन्य व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण “डार्कनेट’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून अमली पदार्थांचा घरपोच पुरवठा करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
“नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने “डिएनएम-इंडिया’, “डिआरईडी” आणि “द ओरिएन्ट एक्सप्रेस’ या ड्रग्जची विक्री करणाऱ्या तीन आभासी बाजारपेठाच उघड केल्या आहेत. या बाजारपेठा इंटरनेटवर “डार्कनेट’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून छुपा व्यवहार करत होत्या. दिल्ली-एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये चार महिने तपास केल्यानंतर ही छुपी बाजारपेठ उघड करण्यात यश मिळाले आहे.
देशपातळीवर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान चार प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत तर 17 ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुरवठ्यासाठी अमेरिका, ब्रिटन, नेदरलॅन्ड आणि पोलंड या देशांमधून कुरिअरच्या माध्यमातून अमली पदार्थ मिळवले जात असत. यासाठी भारतीय टपास सेवेचाही वापर करून घेतला जात असे, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उत्तर विभागाचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
या संदर्भात 22 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील एका व्यक्तीला परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. हे सर्वजण 20 ते 35 वर्षे वयोगटातील आहेत. त्यामध्ये इंजिनिअर, सॉफ्टवेअर तज्ञ, एक डॉक्टर, आर्थिक सल्लागार, व्यापारी, एक एमबीए, एक संगीतकार आणि काही शाळा मध्येच सोडून दिलेलेही आहेत, असेही सिंग म्हणाले.
“एनसीबी’च्या दिल्ली विभागीय युनिटने 975 एलएसडी ब्लॉट, 130 ग्रॅम सायकोट्रॉफिक गोळ्या, 6 ग्रॅम हेरॉईन, पेस्ट आणि द्रव स्वरुपातील कॅनॅबीस, 1.6 ग्रॅम कोकेन, 16 अलप्रायझोलम गोळ्या, 315.8 ग्रॅम चरस, 171 ग्रॅम हशीश चॉकलेट, स्पॅसोमोप्रोक्सीनच्या डझनभर कॅप्सूल आणि 7.9 किलो आयोत केलेला गांजा इतक्या प्रचंड अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
गुजरातच्या किनाऱ्यावर 2 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
“नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ आणि भारतीय नौदलाने गुजरातच्या किनाऱ्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये 760 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त केलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 2 हजार कोटी इतकी आहे. “एनसीबी’आणि नौदलाने गुजरातच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रामध्ये ही कारवाई केली. समुद्रमार्गे केली जाणाऱ्या या तस्करीची गोपनीय माहिती मिळाल्यावर भारतीय नौदलाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. तस्करांच्या बोटीवर कारवाई केल्यावर ती गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर आणण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.