भोपाळ – मध्यप्रदेश सरकारने उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 215 कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आज ही माहिती दिली.
ते म्हणाले की ज्या कैद्यांना बलात्कार अणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे त्यांना मात्र या निर्णयाचा लाभ देण्यात आलेला नाही. सुटका करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे.
या कैद्यांची उर्वरीत शिक्षा माफ करण्यात आली आहे. कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे त्यांना सोडून देण्यात आले आहे. मध्यप्रदेश सरकारकडून दरवर्षीच चांगली वर्तवणूक असणाऱ्या कैद्यांची सुटका केली जाते. शिक्षा माफ करून सोडण्यात आलेल्या कैद्यांचे समाजात उत्तम पुनर्वसन होईल असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.