पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या काहिशी स्थिरावली आहे. शनिवारी शहरामध्ये नवीन 2 हजार 131 बाधितांची नोंद झाली. तर 64 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. आजपर्यंत शहरात 2 लाख 28 हजार 203 जणांना करोनाची लागण झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी (दि. 8) शहरात 2 हजार 131 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाला आज शहरातील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. मृतांमध्ये शहरातील 40 तर शहराबाहेरील 24 जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरामध्ये 1 हजार 919 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 2 लाख 2 हजार 552 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 9 हजार 601 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 4 हजार 258 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.